Feb 1, 2021
शाळत असताना, शाळच्या कुंपणाभाईर काही खाऊचं गाडं असायचं, त्यातलाच एक 'भई' चा गाडा. ' इमली, जामून,
दोडक्याच्या आकाराच्या पापड्या, बोरकूट, मिरच्या (खऱ्या मिरच्या नव्हं!), अन् सर्वात महत्वाचं मनजी
भोंगं(😂😂😂😂, शब्दावर जाऊ नका, आम्ही त्याला भोंगं असंच म्हणायचो, हे भोंगे म्हणजे केशरी आकाराचे
दंडगोलाकार पापड असायचे, त्यावर मसाला लावलेला असायचा. पोरा-पोरांत या भोंग्याविषयी काही अफवा पण हुत्या
उदा- भोंगं प्लॅश्टिक पासून बनलेलं असतेतं अन् पोरं पुराव्याखातर म्हणायची, "भोंगं जाळून तर बग की,
प्लॅश्टिक जळल्याव कसं दिसतं ना तसच दिसतंया." एकदा तर अफवा पसरली होती की भई कडच्या भोंग्यात पाल मेली
म्हणून. पण या अफवांचा काही एक परिणाम होत नव्हता.आमी अगदी चवीनं भोंगं खायचू.)
त्या भईचं बोलणं पण तसच असायचं
"भई दोन रुपयचं भोंगं द्या"
"ही घ्या दोन रुपयचं भोंगं, चला, भया तुमाला काय पाइजे.....ही घ्या रुपयची इमली...बोला....बोला.....मिरची
संपली भया.... ही घ्या दोन रुपयचं जामून....... बोला भया काय पायजे...."
त्या गाड्यावर लय गर्दी असायची, त्या भईचं भोंग्याचं दोन-दोन मोठं मोठं पुडं संपायचं. पोरं त्या भोंग्यावर
इमली लावून खायची, काही जण त्या भोंग्यात भात भरून खायची.(कृपया विचित्र वाटले तर वाटुद्या, कारण हे आहेच
विचित्र)
मला एक गोष्ट मात्र चांगली आठवती, आशुतोष कस्तुरे नावाचा माझा मित्र हाय, त्यो म्हणायचा, " दहा रुपयची भेळ
खाण्यापेक्षा दहा रुपयला वीस भोंगं येतेत आन् एवढ्या भोंग्यात
कदीबी पोट भरतंय"
भोंगं खाण्यामुळं कधी कधी टाळूचं सालटं सोलून निघायचं.
अजून एक कलिंगडाचा गाडा हुता
(१₹- छोटी फोड
२₹ - थोडी मोठी फोड
५₹ - एका प्लेट मध्ये कलिंगडाचं बारीक तुकडं अन् ते खायला काटी चमचा!!)
त्यो मानूस मनाने त्या कलिंगडावर मीठ टाकून देत नव्हता(फक्त ५₹ च्या प्लेट ला मीठ द्यायचा) मग त्याला मीठ
मागून घ्यावं लागायचं.
एकदा आज्याकडं पैसं नव्हतं, त्यानं काय केलं, त्या गर्दीतनं हात घातला व कलिंगडाची फोड घेतली, त्या
माणसाच्या हे लक्षात आलं, त्यो म्हनाला "रूपाय ??" आज्या मान डोलवून "नाय" म्हणला, पुढं काय झालं हे
सांगायची काही गरजच न्हाय.
पण जसजसं आम्ही मोठं होत गिलू तसतसं आमचा कल भेळ आणि वडापाव कडं वाढू लागला. मी, आज्या, पंक्या, दाद्या
(या तिघांच्या पैश्यावरच मी खात होतो हे मी जाहीरपणे सांगतो!!) आम्ही तर रोज न चुकता कमीतकमी एक वडापाव
खायचो. त्या वडापाव वाल्याचं नाव पोरांनी गमतीनी 'अध्यक्ष' ठेवलं होतं. कधी कधी त्याला बाबुराव पण
म्हणायचे (कृपया योग्य तो अर्थ काढावा) त्याचा वडापाव असायचा पाच रुपयाला. मस्त असायचा तो वडापाव. दहावीत
असताना रोज पावणे दहा वाजता सुट्टी व्हायची, तेव्हा न चुकता आम्ही अध्यक्ष च्या गाड्यावर हजर.
पलीकडच्या बाजूला एक छोटासा भेळचा गाडा होता, त्या माणसाचं नाव पाडलं होतं 'लंबू'. लंबू कडे पाणीपुरी
खायची आणि संपत आली की
"भया, गोड पानी द्या की" म्हणायचं, ते गोड पाणी पिऊन पैसे वसूल केल्याच्या आनंदात तिथून जायचं.
लक्याचा पण भेळचा गाडा होता, तो भेळ मध्ये कसलातरी 'कट' टाकायचा, भेळ जास्तीत जास्त तिखट कशी होईल यावर
त्याचा भर असे आणि पोरं ती भेळ चवीनं खायची. (अन् रात्री संडासात मुक्काम ठोकायची😂😂)
इयत्ता सातवीत असताना, रामा घोंगडे सरांचा दर रविवारी ज्यादा तास ठरलेलाच असायचा. त्या तासाला ही मधली
सुट्टी असायची, तेव्हा आम्ही पोरं-पोरं शाळेच्या बाहेर "सँडविच" खायला जायचो ( त्याला सँडविच न्हाय तर
पॅटिस म्हनतेती हे आमाला नंतर कळलं!! पण असो, काय फरक पडतो) तिथे खूप मजा व्हायची, तिथं अजित नावाचा एक
कामगार हूता, अन् त्यो मानूस एकदा म्हनला हुता "आज्या, चल अँगल पूस" अन् तवापसनं सगळी पोरं आज्या ला
टार्गेट करायची, अन् त्याचीच चेष्टा करायची.
अन् आता राहिली मुख्य गोष्ट उधारीची! तुषार नावाचा वर्गातला एक 'गश्टेल' मित्र हुता, त्याच्या उधारीच्या
बातम्या शाळेत सर्वदूर पसरलेल्या असायच्या... "तुशऱ्याची अध्यक्ष कडं बाराशे रूपयची उधारी राह्यल्याय, अन्
जवापसनं अध्यक्ष तेला पैसं मागतुय, तवापसनं गडी शाळंतच आला न्हाय." हे वाक्य मी बाळ्याच्या तोंडातून ऐकलं
होतं. नंतर असं पण कळलं की पैसे घ्यायला अध्यक्ष तुषारच्या घरी गेला होता, व त्याचा बापानं त्याला बेदम
हानला हुता. नंतर काही दिवसांनी तुषारमालक नेहमीच्या रुबाबात शाळेत हजर, पावणे दहाच्या सुट्टीत अध्यक्ष
च्या गाड्यावर आले अध्यक्षनं त्याला उधारी द्यायला नकार दिल्यावर गड्यानं अध्यक्ष च्या वडापाव बद्दल अफवा
पसरवायला सुरुवात केली. "अध्यक्ष चा वडा लई घान असतुया, कसलंबी बटाटू वापरतय ते, अध्यक्ष मावा तितच खातय;
तितच थुकतंय, अध्यक्ष ज्या हातानं घाम पुसतंय त्याच हातानं बेसन कालवतय, अध्यक्ष लय शेम्बडं हाय बाबा..."
वगैरे वगैरे अध्यक्ष बद्दल अफवा पसरवल्या. बिचाऱ्या अध्यक्षला तुशऱ्याला उधारी न देणं जरा महागातच पडलं
म्हणायचं!
सायकल चालवत चालवत आता जेव्हा कधी मी माझ्या शाळेच्या समोरून जातो तेव्हा या सगळ्याची आठवण होते, पण
दुर्दैवाने आता तिथे संगमेश्वर व सँडविच वाल्याचा सोडून दुसरा जुना कोणताच गाडा राहिला नाहीये.
मी ऋषीकेश इंगोले,या माझ्या शालेय जीवनातील काही आठवणी आहेत. मी नेमकी बोलीभाषा वापरायचा प्रयत्न केला
आहे. जिथे संभाषणातील वाक्ये आहेत तिथे बोलीभाषा आहे तशी वापरली आहे, मी शिव्या लिहणं कटाक्षानं टाळलं
आहे!!!