By Atharva and Nilesh

 Nov 12, 2020

काव्यवाचन कार्यक्रम

...

महर्षी व्यास असोत किंवा महाकवी कालिदास, कुसुमाग्रज असोत किंवा मंगेश पाडगावकर, काव्य ही अतिशय मनमोहक बाब वाटते. काव्यरचना करण्याइतकेच काव्य श्रवण रमणीय असते याची अनुभूती सर्वांना यावी यासाठी 'माय मराठी मंडळ' काव्यवाचनाचे नियोजन करण्याचे ठरवत होते. मंडळाने २०/९/२० हा दिवस सर्वांसाठी उपयुक्त आहे हे ध्यानात घेऊन काव्यवाचनाचे आयोजन केले.

कार्यक्रमाचे स्वरूप ठरवताना कवितांच्या सादरीकरणासाठी स्वरचित किंवा नामांकित कवी अथवा कवयित्रींच्या कविता सादर करण्यास अनुमोदन देण्यात आले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गुगल मीट च्या माध्यमातून मंडळाचे सदस्य आणि IISER मधील अनेक काव्याप्रेमींनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

'चित्रवीणा' या बा. भ. बोरकरांच्या कवितेच्या विद्याधीश केळकर यांच्याकडून अतिशय उत्तम सादरीकरणाने कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला. हृषिकेश इंगोले ह्याने कवी कुसुमाग्रजांच्या लोकप्रिय कवितांमधील एक 'स्वप्नाची समाप्ती' या कवितेचे गूढ समजावून सांगितले. 'सांज ये गोकुळी' या सुधीर मोघे यांच्या काव्यरचनेचे समर्पक असे काव्यवाचन विनायक पेंडसे याने केले. प्रणव निटूरकर याने 'कै.कमल. कुलकर्णी यांची 'चिमणीची पिल्लं' कविता अतिशय उत्कटतेने वाचली .प्रेम या विषयावरची मनावर छाप पाडणारी मंगेश पाडगावकर यांची ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं' ही कविता खरोखर लक्षात राहावी अशी होती.

काव्यवाचनसाठी सहभागी झालेले नवोदित कवी आणि कवयित्रींनी त्यांच्या स्वयंरचित कवितांचे वाचन करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विद्याधीश केळकर याने 'इच्छा' या कवितेमध्ये त्याचा शब्दसंपन्नेतेची झलक दाखवून दिली. मराठीची असीम गोडी असणारा आणि मराठीशी प्रत्यक्ष संबंध नसणारा एक अमराठी कवी विक्रम अय्यर याने 'आई' ही कविता सादर श्रोत्यांची दाद मिळवली. 'तू' हि स्वयंरचित कविता श्रुतिका लोकापुरे हिने सादर केली. निलेश खुरकुटे ह्याने भावा-बहिणीचे निस्वार्थ आणि निखळ प्रेम दाखवणारी 'ताई' या कवितेचे सादरीकरण केले. ऋजुता काबाडी हिने आपल्या ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे निवेदन केले.

मराठी मंडळातर्फे समन्वयकांनी उपस्थितांचे आभार मानले आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्रतिकूल काळातही काव्याच्या या आनंदसोहळ्यात उपस्थितांनी मनमुराद आनंद लुटला.

संकलन: निलेश खुरकुटे, अथर्व भिडे