By Nilesh Khurkute

 August 22, 2020

माझी कविता : ताई

...

तो मोगऱ्याचा माळ घरावर शोभून दिसायचा ,
खेळताना कळायचेच नाही दिवस कधी मावळायचा ,
त्या अंधुक सूर्यप्रकाशात तुझा प्रसन्न चेहरा असायचा ,
माझ्या लहानश्या हृदयात भाव समाधानाचा रुजायचा ।।१।।

तेंव्हा काय झाले होते , मला अजून कळले नाही ,
'मामा ' तुला जाणार घेऊन असे बोलू लागले दादा आणि आई ,
मी माझा मस्त , मला हे चाललंय काय ? त्याचा पण अंदाज नाही . ।।२।।

एस .टी . मागे धावताना पडलेले पायाचे गं ठसे ,
परत फिरल्यानंतर दिसले जसेच्या तसे ,
हुंदका जोराचा घेऊन सावरावे कसे ?
चेहरा लागला तो रडू , जो नेहमी हसमुख दिसे ।।३।।

तुझे समजावून सांगणे , मला उमजेना काही ,
माझा हट्ट सडण्यास मी कधी ऐकलो नाही ,
तुझ्या त्या प्रेमळ बोलण्यात मला जाणवली आई ,
तुझा शब्द पाळण्यात मला शंका ना राही ।।४।।

लहान भाबडे ते मन वाट तुझीच गं पाही ,
प्रश्न सारखा मनाला हा बोचतंच राही ,
मी विचार करीन हे तेव्हाचे माझे वय पण नाही ,
सांगे आईला सारखा .... " आई , ताई का गं येत नाही ?" ।।५।।

सोनाआईंच्या बागेतल्या केळी संपवायचो ,
गेनू मामांच्या गोठ्यातल्या घट्ट दुधाच्या मिश्या आणायचो ,
डॉक्टर मामांच्या इंजेक्शनच्या भीतीने जेवायचो ,
पण नेहमीच तुझी जागा रिकामी नाही असे मनाला समजवायचो ।।६।।

' समाधान ' हि भावना पुन्हा भेटल्यावर अनुभवली ,
वाटले मला कि खरंच अमूल्य अशी व्यक्ती पुन्हा सापडली ,
समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो कि का असतील
नाती देवाने बनविली ?
हा उत्तरात प्रश्न आहे कि प्रश्नात उत्तर हि कोडी मला अजून नाही उमगली ।।७।।

बालपण मोठेपणात जगणारी ,
शांत असूनही योग्य हजारजबाबी दाखविणारी ,
' जो क्षण जीवनात येतो आणि जातो
तो क्षण शेवटचा असतो
व तो क्षण प्रत्येकाने आनंदाने घालवावा '
असा विचार करणारी ,
माझी ताई सदैव आनंदात रहावी
हीच ईश्वरचरणी प्रार्थना सारी ।।८।।

-निलेश खुरकुटे